Ahmednagar onion market price : मागील काही दिवसांपासून वाढत असलेले कांद्याचे बाजारभाव आठवडाभरापासून स्थिरावले आहेत. गावरान कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची आवक वाढली असली तरी एकूण आवक मात्र कमी झाली आहे.
नगर बाजार समितीत शनिवारी (दि. १८) एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ४८०० रुपये भाव मिळाला तर सरासरी बाजारभाव ३७०० रुपये प्रतिक्विंटल निघाले आहेत.
नगर बाजार समितीच्या नेती उपबाजारात शनिवारी (दि. १८) ४० ते ४५ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. लिलावात या कांद्याला सरासरी ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलचे बाजारभाव निघाले. उच प्रतीच्या एक नंबर कांद्यास ४८०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव निघाला.
गावरान कांदा आता संपत आला असल्याने त्याची आवक मंदावली आहे. त्याचवेळी लाल कांद्याची आवक वाढली आहे. तथापि मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आहे. आवक घटली असली तरी बाजारभावात मात्र फारसा चढ-उतार नसून ते स्थिर आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला होता. त्यामुळे पेरणी केलेला तसेच लागवडीच्या कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या खरीपातील या लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे.
लाल कांदा बाजारात येत असताना गावरान कांदाही अटोपला आहे. शेतकऱ्यांकडे आता गावरान कांदा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे एकूणच कांद्याची आवक घटली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.