Ahmednagar Onion Price : शुक्रवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत २४ हजार ६६६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते २८०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.
चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.
त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ आहेत त्यांनी कांदा विक्री कारण्याऐवजी साठवणूक केला.मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावरून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढीस लागला होता, त्याचा लोकसभा निवडणुकीत दगाफटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने काही अटी-शर्तींवर कांदा निर्यातबंदी खुली केली.
केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत. यामुळे कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहेत, परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करुन कंदा विकावा लागत आहे.
आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत होता. कारण अगदी काही दिवसात मान्सूनच्या पावसाचे आगमन होईल,
त्यानंतर खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होतील. मात्र यासाठी खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैसे हवे होते. मात्र कांद्याला चांगले भाव नसल्याने गावरान कांद्याला भाव मिळत नसल्याने तो साठवुन ठेवला होता. तो साठवणूक केलेला कांदा कधी विक्री करायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता.
दरम्यान शुक्रवारी नगरच्या बाजार समितीत ४४ हजार ८४८ गोण्यात भरून आलेल्या २४ हजार ६६६ क्विंटल कांद्याला ४०० ते २८५० रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला २२०० ते २८५०, २ नंबरच्या कांद्याला १५०० ते २२००, ३ नंबरच्या कांद्याला ९०० ते १५००, तर ४ नंबरच्या कांद्याला ४०० ते ९०० असा भाव मिळाला.