बाजारभाव

तापमानाचा पारा चढला, लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

Agricultural News : गेल्या वर्षी हस्त बहर फुटला नाही त्यामुळे लिंबाचे ४० टक्के उत्पादन घटले असून यंदा फेबुवारी महिन्यातच लिंबू भाव प्रतिकिलोला शंभरीजवळ गेला आहे.

मार्च, एप्रिलमध्ये लिंबू भाव दोनशेपार जाण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना लिंबू परवडेना आणि भाव वाढल्याने ग्राहकांना लिंबाचा सरबत परवडेना, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

लिंबू उत्पादनात श्रीगोंदा तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील लिंबू देश-विदेशात जाते. यामधून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. तसेच तालुक्यात लिंबू व्यापारातून पाचशे जणांना रोजगारही निर्माण झाला आहे.

मात्र तालुक्यात द्राक्ष, डाळिंबाच्या बागा वाढल्या. औषध फवारणीमुळे मधमाश्या कमी झाल्या तसेच हवामानातील अनियमितता यामुळे तालुक्यात लिंबाचे उत्पादन घटले.

हवामानातील बदल आणि मधमाश्यांची मोहोळे कमी झाली आहेत. याचा अनिष्ट परिणाम लिंबू उत्पादनावर झाला आहे. ९० रुपये भाव मिळत आहे. मात्र बागेत पाच किलो लिंबू सापडत नाहीत. त्यामुळे हा भाव काही कामाचा नाही. -मधुकर शेलार, बेलवंडी

लिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लिंबाची शेती परवडत नाही. अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. यावर कृषी विभागाने दखल घेण्याची गरज आहे. -शंकर भुजबळ, नवनाथनगर, श्रीगोंदा,

भाव वाढणार

लिंबाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले. देशाच्या बाजारपेठेत लिंबाला मार्च, एप्रिल, मे महिन्यात मोठी मागणी असते. त्यामुळे लिंबाला प्रतिकिलो १७५ ते २०० रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हिरवे लिबू तोडू नये. – आदिक वांगणे, नवनाथ शिंदे लिंबू व्यापारी, श्रीगोंदा.

बाजारात आवक घटली

हस्तबहार अपेक्षित फुटलाच नाही. त्यामुळे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आंध्र, गुजरातमधून येणारे लिंबू बंद झाले आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या लिंबू बाजारपेठेत लिंबू भाव खाऊ लागले आहे.

लिंबाचे भाव काय ? (₹)

दिनांक      प्रति किलो
१ जानेवारी    ३५
१५ जानेवारी  ४०
१ फेब्रुवारी   ५५
१६ फेब्रुवारी ६०
२१ फेब्रुवारी ९५

Ahmednagarlive24 Office