Onion market price : एकीकडे कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे काढणीसाठी आलेला कांदा शेतात तसाच ठेवला तर तो नासून जातो आणि जास्त नुकसानच होते. परिणामी कांदा विक्रीसाठी आणला तरीही नुकसान आणि शेतात ठेवला तरीही नुकसान हे ठरलेलेच आहे.
त्यामुळे ‘फूल ना फुलाची पाकळी’ समजून पडेल त्या किंमतीत कांदा विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुरूवातीला साधारणपणे साडेतीन ते चार हजार रूपये प्रतिक्विटल असा दर मिळालेल्या कांद्याला आता कवडीमोल दर मिळत आहे.
यात लागवडीचा खर्च निघणे तर सोडाच; पण पदरचे जास्त पैसे मोजण्याची पाळी येत असल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.
कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु हाच कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो. परंतु कांदा नगदी पीक असल्यामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा देखील लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्याचवेळी कांद्याचे दर मात्र खूपच घसरले आहेत.
तर दुसरीकडे मात्र मजुरी व खते व औषधांचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यातच परत निसंगाचा लहरीपणा, त्यामुळे वाढलेली रोगराई या सर्व घटकांवर मात करत कांद्याचे प्रत्यक्ष उत्पादन हातात येईपर्यंत मोठा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो परंतु कांदा बाजारात येतात भाव पडतात.
ही संकटे कमी होती म्हणून केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतात आहे त्या परिस्थितीत कापून आणलेला कांदा, त्यातच अलिकडे हिट अॅन्ड रन प्रकरणात केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कायद्याच्या विरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संप व अन्य कारणांमुळेमागील दोन-अडीच महिन्यांपासून कांदा दर घसरण सुरूच आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारात शनिवारी झालेल्या लिलावात ८१ हजार १७३ गोण्यात ४४ हजार ६४५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
यात कमीत कमी १०० मध्यम ९०० तर जास्तीत जास्त १५०० रूपये दर मिळाला. यातील एक नंबर कांद्याला ११०० ते १५००, दान नंबर ६०० ते ११००, तिन नंबर ३०० ते ६०० तर ४ नंबर १०० ते ३०० असा दर मिळाला.
एकूणच लागवड, मजुरी, औषध फवारणी, कापणी आणि वाहतूक या बाबींवर होणारा खर्च विचारात घेता कांद्याला प्रतिक्विटल किमान चार ते साडेहजार रूपये मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. परंतु दर घसरणीमुळे आर्थिक ताळमेळ पूर्णतः विस्कटून गेल्यामुळे कांद्याने वांदा केल्याचे शेतकरी सांगतात.