Maharashtra Cotton Price : कापूस हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. कापसाची शेती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये केली जाते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होते. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते.
यातील जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. येथील बहुतांशी शेतकऱ्यांची या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये कापसाची कमी-अधिक प्रमाणात लागवड केली जाते.
खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या या पिकाची दरवर्षी विजयादशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आवक होते. पण, राज्यातील काही भागात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदी सुरू होत असते.
यंदाही काल अर्थातच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांमध्ये कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला आहे. काल, खानदेश येथील धरणगाव येथे कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला आहे. धरणगाव तालुक्यातील भौद येथील प्रयोगशील कापूस उत्पादक शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील यांनी काल धरणगाव येथे आपला कापूस विक्रीसाठी आणला होता.
अधिकार पाटील यांच्या कापसाला यावेळी सर्वाधिक दर मिळाला आहे. काल धरणगाव येथे काटा पूजन करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला गेला आहे. यावेळी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना महाप्रसादाचा सुद्धा लाभ मिळाला.
धरणगावला जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापूस उत्पादक शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील यांच्या कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार १५३ रुपये भाव मिळाला आहे.
मागील वर्षी अर्थातच 2023 मध्ये कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला त्यावेळी कापसाला ५ हजार १५३ रुपयांचा दर मिळाला होता. एकंदरीत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळातही कापसाला समाधानकारक दर मिळतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
एकंदरीत येत्या काही दिवसांनी कापसाच्या नवीन मालाची आवक होणार आहे अन त्याआधीच कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला असून कापसाला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यंदा कापसाला काय भाव मिळू शकतो?
यंदा कापसाचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला राहण्याची शक्यता आहे. पण, जागतिक परिस्थिती, गुजरात व तेलंगणामधील पूरस्थिती या सर्व गोष्टींचा विचार केला असता यंदाही कापसाचे दर दहा हजारापर्यंत जाणार नसल्याचे दिसत आहे. यंदा कापसाचे भाव साडेआठ हजार रुपयांच्या आतच राहण्याची शक्यता बाजारातील अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.