बाजारभाव

दैनंदिन जीवनातील भाजीपाला, तांदळासह डाळींचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट ढासळले !

Published by
Ahmednagarlive24 Office

संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. उत्तर आणि मध्य भारतात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतींवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजीपाल्याच्या किमती वधारल्या आहेत. देशातील मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत.

टोमॅटो, कांदे आणि बटाट्यााच्या किमती वाढल्या आहेत. भाजीपाला, तांदळासह डाळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यंदा तीव्र उन्हाळ्याने भाजीपाला उत्पादन घटले होते, तर आता मान्सूनमुळे भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत.

टोमॅटोचे कमाल भाव १३० रुपयांवर पोहोचले, तर कांद्याची किंमत ९० रुपये किलो झाली. तर भाजीपाल्यासहित इतर खाद्यान्नाच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमतींनी देशात शतक ठोकले आहे. तर इतर भाजीपाल्याने अर्धशतक पूर्ण केले आहे.

२ जुलै रोजी बटाट्याचा कमाल भाव ८० रुपये किलो, कांद्याचा कमाल भाव ९० रुपये किलो तर टोमॅटोचा कमाल भाव १३० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला होता. मान्सूनमुळे देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव १०० रुपयांच्या घरात पोहचला. तर सरासरी भाव ५४.५० रुपये आहे.

अंदमान निकोबार बेटावर टोमॅटोचा भाव सर्वाधिक आहे. कांदा काही शहरात ६० रुपये तर बटाटे ६१.६७ रुपये किलो दराने विक्री होत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, उत्तर भारतात टोमॅटो महागला असून कांदा ४५ ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. तर बटाट्याची किंमत पूर्वी १० ते १२ रुपये किलो होती, तो भाव आता ४० रुपये किलोवर पोहचला.

देशातील काही भागात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. उष्णतेच्या लाटांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले तर आता पावसामुळे भाजीपाल्यासह डाळींच्या किमतीत वाढ झाली आहे. बटाटे, टोमॅटो, कांदा, लसूण आणि इतर भाजीपाल्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

आता मान्सून दाखल झाला असला तरी वाहतुकीतील अडचण, साठवणुकीची समस्या आणि पावसामुळे भाजीपाला लवकर खराब होतो. आवक घटल्याने भाजीपाला महागला आहे.

Ahmednagarlive24 Office