बाजारभाव

कांदा निर्यातीबाबत मोदी सरकारची नवीन भूमिका समोर, निर्यात सुरू होणार की नाही ? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Published by
Ahmednagarlive24 Office

Onion News : कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरेतर, रविवारी अर्थातच 18 फेब्रुवारी 2024 ला गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली कांदा निर्यातीच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला असल्याचे वृत्त समोर आले होते.

या बैठकीत केंद्र सरकारने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली असल्याचे बोलले जात होते. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल असे वाटतं होते. पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभावात कांद्याची विक्री करता येणार असे बोलले जात होते. मात्र, याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जोर का झटका दिला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातीबाबत आपली नवीन भूमिका समोर ठेवली आहे. केंद्र शासनाचे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज 20 फेब्रुवारी 2024 ला पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रोहित कुमार सिंह यांनी कांदा निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार अशी माहिती दिली आहे. याचाच अर्थ निर्यात बंदी उठवली जाणार नाही हे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारला देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवायची आहे आणि किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवायचे आहेत असे म्हणत त्यांनी निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत सुरूच राहणार असे सांगितले आहे.

यामुळे केंद्राचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. खरे तर ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा खरेदी करता यावा यासाठी केंद्राने 25 रुपये प्रति किलो या दरात कांदा बफर स्टॉकमधील कांदा उपलब्ध करून दिला. यानंतर केंद्राने किरकोळ बाजारातील किमती आणखी कमी व्हाव्यात यासाठी डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदी सुरु केली.

ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लावण्यात आली आहे. मात्र, रविवारी ही निर्यात बंदी आता उठवली जाईल असे वृत्त समोर आले होते. परंतु याची अधिसूचना निर्गमित होण्याआधीच केंद्राने कांदा निर्यात बंदी बाबत आपली नविम भूमिका जाहीर केली असून कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत सुरूच राहणार असे स्पष्ट होत आहे. यामुळे मात्र कांदा उत्पादकांमध्ये कमालीची असंतोषाची भावना पाहायला मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office