बाजारभाव

राहुरीच्या बाजारात झेंडूचे भाव गडगडले : आवक वाढल्याने झाला परिणाम

Published by
Ahmednagarlive24 Office

Rahuri market : राहुरीच्या बाजारात दसरा सणासाठी झेंडू फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने झेंडूचे दर घसरले; मात्र शेवंतीचे भाव टिकून आहेत. तालुक्यात यावर्षी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती.

मोठ्या आशेने सणावाराला फुलाचे भाव वाढतील व दोन पैसे मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली; पण भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. केलेला खर्च फिटणे मुश्किल झाले आहे.

दसऱ्याला मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच बाहेरून झेंडू फुलांची आवक झाल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर गडगडले. दराची घसरण झाल्यामुळे चार पैसे मिळतील, या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. भांडवलासाठी घातलेल्या खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, याचे कोडे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना पडले आहे.

गणपती, दसरा दिवाळी या सणासुदीला बाजारात फुलाची मागणी वाढते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस घटाला फुलांची माळ, देवीच्या पुजेसाठी दररोज हार लागतात. दसऱ्याच्या दिवशीदेखील वाहनाला, दुकानाला कार्यालयांना हारासाठी फुलांची आवश्यकता असते. दसरा सणास बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते.

उत्सवात फुलांची मागणी असल्यामुळे दर वाढल्यास चार पैसे हातात येतील, या आशेने फुल उत्पादक शेतकरीदेखील दराकडे डोळे लावून बसतो. यंदा बाजारात बाजारात झेंडूच्या फुलाची आवक मोठ्या प्रमाणावर आहे: मात्र दराची लाली वाढली नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता वाढली आहे.

यंदा पाऊस नसल्याने माल खराब झाला नाही. शिवाय रोगाचा प्रादुर्भावदेखील कमी आहे. दसरा सण डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. लागवड जास्त असल्याने बाजारात मालाची आवक सण, उत्सवात लोक पूजेसाठी फुलाचा वापर करतात. नगर मार्केटमध्ये झेंडूचा दर २० रुपयांपर्यंत होता तर राहुरी मार्केटमध्ये २५ रुपयांवर आल्याने भांडवल तरी निघेल काय याची शंका आहे. दिवाळीत दराचे काय दिवे लागतात हे पहावे लागेल.

बाजारात लाल-पिवळ्या रंगाची झेंडूची फुले आहेत. झेंडूमध्ये लाल, ऑरेंज, कोलकाता, जंबो आदी जाती आहेत. तसेच, पिवळ्या रंगात स्मार्ट यलो, कांचन, श्रावणी जातीची फुले विक्रीसाठी आली आहेत. सध्या बाजारात फुलांचा प्रतिकिलोचा दर ३० ते ४० रुपये आहे.

आवक वाढल्याने व्यापारी शेतकऱ्यांना मार्केटला फुले पाठवू नका, असे सांगत मात्र फुललेल्या बागेचे करायचे काय? याचे कोडे फुल उत्पादक शेतकऱ्यांना पडले आहे. झेंडूच्या तुलनेत सध्या शेवंतीचा भाव किरकोळ विक्रीसाठी १०० रुपये होता. राहुरी बाजारात दुपारनंतर झेंडू २० रुपये किलोने विकला गेला तर शेवंती ६० ते ७५ रुपये दराने विकली गेली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office