Soybean Rate Maharashtra : सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या तेलबिया पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. याला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्रात 40% आणि मध्य प्रदेश मध्ये 45 टक्के एवढे उत्पादन घेतले जाते.
मध्यप्रदेश हे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. सोयाबीन हे खरीप हंगामात पिकवले जाते. जून महिन्यात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची लवकर लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी तयार झाला असून आता नवीन मालाची आवकही होऊ लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील नवीन सोयाबीनची आवक झाली आहे.
खऱ्या अर्थाने सोयाबीनचा हंगाम हा विजयादशमीपासून सुरू होत असतो. दसऱ्यापासूनच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होत असते. मात्र काही शेतकरी सोयाबीनची लवकर लागवड करतात आणि अशाच शेतकऱ्यांचे सोयाबीन आता बाजारात येत आहे.
आज लोणार तालुक्यातील बिबी येथील जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये नव्या सोयाबीनची आवक झाली. या नव्या सोयाबीनला 4 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. तालुक्यातील चोरपांग्रा येथील अशोक डहाळके यांच्या नव्या सोयाबीनला हा भाव मिळाला आहे.
या प्रयोगशील शेतकऱ्याने सहा क्विंटल अन एक किलो सोयाबीन विक्रीस आणले होते. यंदाच्या हंगामात सोयाबीन साठी 4892 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात नव्या सोयाबीनला अवघा साडेचार हजाराचा भाव मिळाला आहे.
म्हणजेच नवीन मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन माल बाजारात आल्यानंतरही फारसा उत्साह दिसत नाहीये.
परंतु काही शेतकऱ्यांना सोयाबीन हंगामाचा हा सुरुवातीचा काळ असल्याने आगामी काळात याचे दर वाढतील अशी आशा आहे. खरे तर सध्याचे दर हे हमीभावापेक्षा कमी आहेत.
यामुळे आगामी काळात सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे जेव्हा विजयादशमीपासून सोयाबीनची आवक वाढेल तेव्हा सोयाबीनचे दर कसे राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.