उन्हाचा पारा सध्या ४० अंशाच्यावर पोहोचल्याने शहरटाकळी, दहिगांवनेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने शीतपेय, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, याचा परिणाम लिंबाच्या भाव वाढीवर झाला आहे.
काही दिवसापूर्वी दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत लिंबाचे दर पोहोचले होते. एक लिंबासाठी पाच रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.
उन्हाळ्यात लिंबांची मागणी प्रचंड वाढत असल्याने त्याचे दर देखील जास्त प्रमाणात वाढलेले आहे. सध्या बाजारात २०० ते २५० रुपये प्रतिकिलोने ठोक बाजारात लिंबांचे दर आहेत. सध्या बाजारात लिंबू चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.
परिसरात बहुतांश ठिकाणी लिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. परंतु पाणी नसल्यामुळे लिंबाचे उत्पादन कमी झाले. वाढत्या मागणीमुळे गरज पूर्ण होत नसल्याने बाहेरून लिंबू विक्रीसाठी आणले जात आहेत. याचाच परिणाम लिंबाच्या भाव वाढीवर झालेला दिसून येत आहे.