Pune Chakan Market : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक झाली. टोमॅटोची भरपूर आवक होवूनही भाव कडाडले आहेत.
टोमॅटोला एका किलोसाठी १०० रुपये, आले १५० रुपये किलो, तर वाटाणा २०० रुपये किलो असा भाव असल्याने शेतकरी व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. टोमॅटो बरोबरच चाकण मार्केटमध्ये गुजरातचा चक्राकार डांगर भोपळा दाखल झाला असून,
त्याचे भावही तेजीत आहेत. या भोपळ्याची सात टन उच्चांकी आवक झाली असून, या भोपळ्याला मोठी मागणी आहे. गेल्या महिनाभरापासून तोतापुरी कन्या व वाटाणा मोठ्या प्रमाणात दाखल होवू लागला आहे. शेत मालाला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या त्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत.
ठोक बाजारात कांदा, बटाटा व लसणाची मोठी आवक होत आहे. तरकारी बाजारात हिरवी मिरची, लिंबू, गाजर, वाटाणा, फ्लॉवर, वांगी व दोडक्याचे भाव तेजीत आहेत. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व पालक भाजीची प्रचंड आवक झाली असून त्यांचे भाव कडाडले आहेत.
कांदा, बटाटा व कारल्याच्या भावात चढ उतार होत आहे. येत्या काही दिवसात ओल्या भुईमूग शेंगा दाखल होतील, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रविंद्र बोराटे व तरकारी मालाचे आडतदार धनंजय बोराटे यांनी सांगितले.