२४ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : तूर पिकाला चांगला दर मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच तुरीचे जेमतेम आगमन होते न होते तोच तुरीचे दर बाजारात कोसळल्याने आधीच संकटांचा सामना करणाऱ्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीदर तरी मिळावा, यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
ही मागणी करताना त्यांनी सोयाबीन प्रमाणे तुरीचे वांदे होऊ नये,याची काळजी घेण्याचीही विनंती शासकीय यंत्रणांना केली आहे.सद्यस्थितीत तुरीचे दर तीन हजार रुपयांनी कोसळले आहेत.खरीप हंगामात सोयाबीन बरोबरच शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून पैसा मिळवून देणाऱ्या तुरीला मागील वर्षी पेरणी दरम्यान १२ हजार रुपयांचा दर मिळाला होता.
तुरीच्या दरातील तेजी बघता यंदा शेतकऱ्यांचा कल वाढून पेरणी क्षेत्रातही वाढ झाली.शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी दहिगावने परिसरात सोयाबीन आणि आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले जाते.सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याने उत्पादन खर्चही वसूल झाला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त ही तूर या नगदी पिकावर होती.सध्या शहरटाकळी परिसरात तूर काढणी हंगाम सुरू असून, तुरीचे एकरी उत्पादनही सतत हवामानात होणाऱ्या बदलाने कमी झाले असून, एकरी दोन ते पाच पोत्यांपर्यंत उत्पादन मिळत आहे.
परिसरातील काही भागात कापणी पूर्ण होऊन नवीन तूर बाजारात येऊ लागली आहे.सध्या आवक अल्प असली तरी येणाऱ्या काळात तुरीची आवक सरासरी वाढणार आहे.या काळात दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.नवीन तुरीला किमान ६८०० ते ७००० रुपये दर मिळत आहे.केंद्राने तुरीला ७५५० रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे.या दरापेक्षा कमी दर बाजारात मिळत आहेत.
प्रत्यक्षात मागील वर्षभर तुरीला दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला.आता नवीन तूर बाजारात दाखल होत असताना हामी दरापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीभाव तरी मिळावा,यासाठी शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तूर पीक घेण्याकडे आपला कल वाढवला आहे.मात्र, तूर काढणी पूर्वीच तुरीचे भाव जवळपास चार हजारांनी कमी झाले आहेत, त्यामुळे नाफेड मार्फत तूर खरेदी करून किमान हमीभाव तरी मिळावा,अशी अपेक्षा आहे – (संतोष पुरोहित, शेतकरी, मठाचीवाडी)