Agricultural News : यावर्षीच्या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून, अनेक ठिकाणी फळगळती झाली तर अनेक भागात कमी प्रमाणात बहार आल्याने उत्पादनात घट आली आहे.
त्यामुळे संत्रा, मोसंबीसह लिंबाचे देखील उत्पादन घटले आहे. सध्या बाजारात लिंबाची आवक सुरू झाली असून उन्हाळा देखील सुरू झाला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील लिंबू सरबत, उसाची रसवंतीगृह सुरू झाली आहेत.
मात्र उन्हाळ्याच्या सुरवातीलाच लिंबाचे बाजारभाव वाढले असून लिंबाने शंभरी पार केली आहे. लिंबाचे बाजार वाढत असताना आवक मात्र कमी होत आहे.
जिल्ह्यात अनेक भागात लिंबाचे उत्पादन घेतले जाते.दरम्यान मागील वर्षी सुरुवातीला पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्यावाचून फळबागा करपल्या यात काहींनी टँकरद्वारे विकत पाणी पुरवठा करून फळबागा जगवल्या मात्र त्यांना अत्यंत कमी परिणाम फळधारणा झाली रत काही झाडांना फळे आलीच नाहीत.
जी थोडाफार आली होती त्याला देखील नंतर झालेल्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे यंदा सर्वच फळांचे उत्पादन कमी होत आहे. नगर जिल्ह्यातून जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू कन्याकुमारी कलकत्ता, दुबई या भागात लिंबू निर्यात केले जाते.
ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाला चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे. सध्या किरकोळ बाजारात ग्राहकांना १२० ते १३० रुपये किलोसाठी मोजावे लागत आहेत. एरवी कमी भावात विकल्या जाणाऱ्या लिंबाचे यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच भाव वाढण्यास सुरवात झाली.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव मिळत असून उत्पादन कमी असल्याने भाव मिळूनही शेतकऱ्यांचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने मार्चपासूनच भाववाढीला सुरवात झाली. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना भर उन्हळ्यात लिंबू शरबतचा आस्वाद घेणे महाग होण्याची शक्यता आहे.