Tur Crop Market Update:- तुर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामात तुरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. खासकरून जर आपण महाराष्ट्रातील विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी तूर लागवड खरीप हंगामात जास्त प्रमाणात होते.
दुसऱ्या दृष्टिकोनातून तुरीचे महत्त्व पाहिले तर दैनंदिन वापरामध्ये तुरीची डाळ मोठ्या प्रमाणावर वापरली जाते व त्या दृष्टिकोनातून बाजारपेठेत देखील तुरीला जास्त मागणी असते. कडधान्य वर्गातील पिकांचा विचार केला तर तूर हे प्रमुख पीक असल्यामुळे केंद्र सरकारचे देखील या पिकाच्या आयात किंवा निर्यात धोरणांवर बऱ्याच प्रमाणात लक्ष असते.
याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून तूर ही निर्यातीसाठी खुली करण्यात आलेली आहे व आयात कोठा हा मर्यादित ठेवलेला आहे. एवढेच नाही तर आपण डीजीएफआयचा अहवाल पाहिला तर तुरीसाठीचे जे काही मुक्त आयात धोरण आहे त्याला मार्च 2024 पर्यंत मुदत वाढ देखील देण्यात आलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत तुरीची बाजारपेठेतील स्थिती काय राहील? याबाबत तज्ञ काय म्हणतात? याबाबतची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत तुरीची बाजारभावातील स्थिती काय राहील?
जर आपण खरीप हंगामातील तुरीचा विचार केला तर डिसेंबर ते एप्रिल या कालावधीमध्ये तूर विकली जाते म्हणजेच हा कालावधी तुरीचा विक्री हंगाम असतो. जर आपण चालू वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये तुरीची आवक कमी राहिलेले आहे.
म्हणजेच मागच्या वर्षी या कालावधीमध्ये 2.9 लाख टन तुरीची आवक होती तर ती यावर्षी 2.01 लाख टन राहिली. दुसरे महत्त्वाचे म्हणजे खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या तुरीची काढणी प्रामुख्याने डिसेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान केली जाते. यासंबंधी भारत सरकारच्या माध्यमातून देखील नवीन उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे व त्यांच्या अंदाजानुसार पाहिले तर वर्ष 2023-24 मध्ये तुरीचे उत्पादन हे 34.21 लाख टन असेल अशी शक्यता आहे व मागच्या वर्षीच्या तुलनेचा विचार केला तर त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होईल असे देखील दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील तूर उत्पादनात मात्र घट होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 9.2 लाख टन तुरीचे उत्पादन झाले होते तर यावर्षी ते 8.7 लाख टन पर्यंत कमी होईल अशी एक शक्यता आहे. तसेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीची आयात वाढलेली आहे व निर्यात देखील कमी झालेली आहे. डिसेंबर 2022 पासून तुरीच्या किमती सतत वाढत असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुरीचे बाजार भाव जास्त आहेत
मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जानेवारी ते मार्च कालावधीतील सरासरी किमती
लातूर बाजारपेठेचा विचार केला तर या ठिकाणी 2021 या वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीत तुरीला 6498 प्रतिक्विंटल, जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत सहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 7735 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला होता. यावर्षी सरकारने 7000 रुपये प्रति क्विंटल एमएसपी तुरीसाठी जाहीर केलेले आहे व त्यापेक्षा सध्याचे बाजार भाव जास्त आहेत.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत पुणे येथील तज्ज्ञांचा तुर बाजारभावा बाबत अंदाज
पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षेतील तज्ञांनी तुरीबाबतचा अंदाज वर्तवला असून जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत तुरीचे संभाव्य दर काय असतील याची माहिती दिली असून आयात जास्त राहील अशी शक्यता धरून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार लातूर बाजारातील तुरीच्या संभाव्य किमती या जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल राहतील असा एक अंदाज आहे.