अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- शहरात सन २००९ सालापासुन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बळी प्रतिपदेला दरवर्षी आयोजित होणारा ‘बळी’ महोत्सव आणि सम्राट एकलव्य जयंती या उत्सवाची नियोजन बैठक नुकतीच अहमदनगर शहरात आयोजित करण्यात आली होती.

यात यंदाचा बळी महोत्सव आणि सम्राट एकलव्य जयंती आज शुक्रवार दि.५ रोजी आयोजित केलेली आहे. यावेळी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन नुतन अध्यक्ष रविंद्र वाबळे यांनी केले आहे. आपला बहुजन समाज, शेतकरी, कामगार आणि स्त्रीया बौध्दीक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हाव्यात, आपला भारत देश जगात पुढे जावा, परिवर्तन व्हावे.

यासाठी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य कारणी लावले. त्यांनी विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. विविध सण उत्सव सुरू केले.

त्याकाळी पुण्यामधे बहुजन समाजाच्या एकजुटीसाठी त्यांनी ‘झेंड्याची मिरवणूक’ सुरू केली होती. त्याचाच आदर्श घेत पुणे येथे सत्यशोधक सभा आणि इतर सर्व समविचारी संघटनांनी बळी महोत्सव सुरू केला.

त्याला सर्व समाज बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याचाच आदर्श घेत अहमदनगर शहरातील इतिहासप्रेमी मंडळ आणि इतर समविचारी संघटनांनी येथे सन २००९ साली बळी महोत्सवाची सुरूवात केली.

ही पहिली बळीराजाची मिरवणूक छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक, रेसिडेन्सिअल हायस्कुल समोर ते दिल्लीगेट व्हाया कापडबाजार माळीवाडा येथील महात्मा फुले स्मारक येथेपर्यंत आयोजित केली जाते.

शहरातील सर्व मिरवणुका शहरात सुरू होऊन शहराबाहेर दिल्लीगेट येथे विसर्जित होतात. पण ही एकमेव मिरवणूक शहराबाहेर सुरू होऊन शहरातील महात्मा फुले स्मारक येथे विसर्जित केली जाते.