अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- रब्बी हंगामाच्या तोंडालाच रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Baliraja financial crisis)

एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे पूरपरिस्थितीने हैरान झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यात पाऊस वेळेवर झाला नाही म्हणून पिके वाया गेली.

जी वाचली होती, ती शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाने वाया गेली. त्यामुळे शेतकरी त्यातून अद्याप सावरलेला नाही. हे कामी की काय म्हणून आता रब्बीतही खतांच्या किमतींत वाढ झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड करावी लागली.

त्यातच आता रासायनिक खतांकरीता लागणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने रासायनिक खतांच्या किमतीत ३०० ते ३५० रुपये वाढ झाली असून,

केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी लागणारा गॅस उपलब्ध करून दिल्यास नक्कीच रासायनिक खतांच्या किमती कमी होतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जास्तीचे पैसे मोजून खते विकत घेण्याशिवाय आता त्याच्यासमोर पर्यायही राहिलेला नाही. युरियाचा व डीएपी खताचे भाव जरी वाढला नसले,

तरी रब्बीसाठी लागणाऱ्या खतांच्या किमती मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम भारतातील बाजारपेठेवर झाल्याचे काही तज्ज्ञांकडून सांगितले जाते.