file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- सिक्कीमने 1 जानेवारीपासून राज्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर बंदीची घोषणा केली आहे. यानंतर लोकांना पाण्यासाठी स्वतःचे थर्मास किंवा इतर साधनाची व्यवस्था करावी लागणार आहे.

प्लास्टिकच्या वापराविरोधात मोठा पुढाकार घेत सिक्कीमने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयाबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पीएस तमांग म्हणाले की, बंद बाटलीतील मिनरल वॉटर राज्यातील पर्यावरण प्रदूषण वाढवत आहे.

पाण्याची बाटली वापरल्यानंतर लोक ती सर्वत्र फेकून देतात. यामुळे केवळ राज्याचे सौंदर्यच बिघडत नाही तर गंभीर पर्यावरणीय संकटही निर्माण होत आहे.

गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री तमांग म्हणाले, 1 जानेवारी 2022 पासून सिक्कीममध्ये बाटलीबंद पाण्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल.

राज्यात असे अनेक नैसर्गिक स्त्रोत आहेत, जिथून ताजे आणि उत्तम दर्जाचे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्यानंतर सरकार लोकांना नैसर्गिक स्रोतांमधून पाणी पुरवणार आहे.

म्हणजेच राज्याच्या कोणत्याही भागात लोकं शुद्ध पाणी पिऊ शकतील. दरम्यान कंपन्यांना त्यांचा विद्यमान स्टॉक संपवण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना वेळ दिला जाणार नाही.