अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने सुरु आहे. नुकतेच राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ लाख ७६ हजार मुलांना लसलाभ मिळाला.

लसपात्र मुलांपैकी २.९ टक्के मुलांचे लसीकरण पहिल्याच दिवशी झाले. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून, तिसऱ्या लाटेच्या सावटाच्या पार्श्ववभूमीवर सोमवारपासून किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाल़े आहे.

राज्यात सोमवारी सायंकाळी साडेसहापर्यंत १ लाख ७६ हजार ५५२ मुलांचे लसीकरण झाले. राज्यभरात या वयोगटातील सुमारे ६० लाख मुले पात्र असून, यातील २.९ टक्के मुलांचे लसीकरण झाले.

राज्यभरात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १९ हजार ८२९ मुलांचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. या खालोखाल पुण्यात १७ हजार २७६, नगरमध्ये १६ हजार १२७ तर सांगलीमध्ये १४ हजार ४५० मुलांना लस देण्यात आली.

मुलांच्या लोकसंख्येनुसार, सांगलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. त्या खालोखाल धुळे, नगर, पालघर, कोल्हापूर, बीड, यवतमाळ आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात सर्वात कमी प्रतिसाद चंद्रपूर जिल्ह्यात मिळाला असून मुलांच्या लोकसंख्येनुसार या जिल्ह्यात केवळ ०.२ टक्के(२३७) मुलांचे लसीकरण झाले आहे.

त्या खालोखाल वाशिम, जालना, नंदुरबार, भंडारा, वर्धा येथे एका टक्क्यापेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. दरम्यान लसीकरण नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने सोमवारी प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी अनेक केंद्रांवरील वेळा आधीच आरक्षित झालेल्या होत्या.