file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार अण्णा हजारे यांना अशक्तपणा जाणवायला लागल्याने त्यांना आज सकाळी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत.दरम्यान त्यांच्या कार्यालयाकडून नुकतेच याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने ही अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात येत आहे.

आदरणीय अण्णा काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते.

काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली.

त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे.

कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत.

विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी आजिबात काळजी करण्याचे कारण नाही.