अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- प्रकरणे कोणतीही असो मात्र आजच्या परिस्थिती पाहता राज्यातील सत्ताधारी मंत्री मंडळींच्या मागे कारवाईचे सत्र सुरूच आहे. यामुळे नेतेमंडळी देखील या कारवायांमुळे चांगलेच धास्तावले आहे.

नुकतेच महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या नेत्याला अटक झाली व काही काळानंतर सुटका देखील झाली. हे मंत्री दुसरे तिसरे कोणी नसून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ठाण्याच्या आनंद नगर भागात राहणारे अनंत करमुसे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती.

या घटनेनंतर 5 एप्रिल रोजी आपणास आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण झाल्याची तक्रार करमुसे यांनी पोलिसांकडे केली होती.

करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तक नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यात तीन पोलिसांचाही समावेश होता.

आव्हाड यांच्या उपस्थितीत मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आव्हाड यांना या प्रकरणी अटक झाली. त्यानंतर काही वेळेतच न्यायालयाने दहा हजार रुपये व दोन जमीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.