अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- विधिमंडळाच्या आवारात पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविषयी ‘म्यांव म्यांव’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांचे निलंबन करा, या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला.(MLA Nitesh Rane) 

त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही शिवसेना सदस्यांनी लावून धरल्याने राणे कात्रीत सापडले आहेत.

विधानसभेच्या कामकाजातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली.

राणेंनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी कांदे यांनी केली. यावर निर्णय देताना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी कोरोनाकाळात अधिवेशन कमी दिवसांचे आहे.

त्यात गोंधळ झाला तर जनतेत वेगळा संदेश जाईल, असे सांगताना निलंबनाबाबत मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.