file photo

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- सर्व घटकांतील लोकांचे जीवन आनंदमय करण्यात व राज्यातील सर्वच कामगारांना नोकरीत सुरक्षा दिल्यानंतर राज्यात भाजपने पुन्हा सत्तेवर येण्याचा नादच करायचा नाय, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला दिला.

अकोलेतील महाराजा लॅान्स येथे शुक्रवारी आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे हे होते. स्वागत व प्रास्तविक तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यानी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे लोकनेते अशोक भांगरे, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, यमाजी लहामटे, विनोद हांडे, संदीप वर्पे, कपिल पवार, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, सरपंच दिलीप भांगरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, ज्येष्ठ नेते संपत नाईकवाडी, उद्योजक सुरेश गडाख,

संजय वाकचौरे, भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, स्वाती शेणकर, रवी मालुंजकर, भागवत शेटे, अमीत नाईकवाडी, संतोष नाईकवाडी, शहर कार्याध्यक्ष अक्षय आभाळे उपस्थित होते. माजी आमदार पिचड पितापुत्रांचा नामोल्लेख टाळून मंत्री मुश्रीफ म्हणाले,

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी सुमारे ४० वर्ष ज्यांना महत्त्वाची पदे दिली, आदिवासी विकास खाते देऊन या राज्याची तिजोरी हातात दिली, त्यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर पवार साहेबांबरोबर विश्वासघात केला.

ते भाजपात गेल्यानंतर अकोल्यातील जनता पेटून उठली व त्यांची जागा कोठे आहे ते डॉ. लहामटेंना प्रचंड मताधिक्य देऊन दाखवून दिले. या ऐतिहासिक परिवर्तनात अशोक भांगरे व इतर कार्यकर्त्यांसह जनतेने डॉ. लहामटे यांना आमदार करण्याबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयास सलाम करण्यासाठी मी आज अकोल्यात आलो आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते तालुक्यातील बारी, राजूर, गुरवझाप येथील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. या मेळाव्यात बहुतांश लोक विनामास्क होते. सामाजिक अंतर न पाळता बैठक व्यवस्था होती.