Ahmednagar News:महाविकास आघाडीच्या काळात नियुक्त करण्यात आलेले शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून बरखास्त अखेर बरखास्त करण्यात आले.

आठ आठवड्यांत नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात यावे, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे त्रिसदस्यीय समितीकडे देवस्थानचा कारभार सोपविण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

हे विश्वस्त मंडळ नियमानुसार नियुक्त करण्यात आलेले नाही, निकष पाळले गेले नाहीत, असे आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या.

त्यावर सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज तो जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या राजकीय घोळानंतर हे म़ंडळ नियुक्त करण्यात आले होते.

तीन पक्षांच्या सरकारमुळे कोटा ठरणे आणि त्यानुसार नियुक्ती होण्यास विलंब लागला. पहिल्या टप्प्यात अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह काही सदस्यांची नियुक्ती झाली.

त्यानंतर न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर उरलेल्या सदस्यांची नियुक्ती झाली. मात्र, विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना सरकारने स्वत: च केलेला कायदा पाळला नाही,

असा आरोप करून कोपरगावमधील साईभक्त तथा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्यासह अन्य काही भक्तांनी याचिका दाखल केल्या. याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल प्रलंबित होता. सुमारे चार महिन्यांनंतर आज तो जाहीर करण्यात आला.