अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  राहुरी तालूक्यातील टाकळीमियाँ येथे रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत मोठया प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रशासनाने या घोटाळयाची सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

या मागणीसाठी आज आरपीआय आठवले गटाचे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे रमाई घरकुल आवास योजना सन २०१८-१९ मध्ये मंजुर झालेल्या घरकुल यादीतील अनुक्रमांक २७ मधील लाभार्थी बाळासाहेब नाना सगळगीळे यांचे घरकुल यादीत नाव आहे.

तर टाकळीमियॉ येथील ग्रामसेवक यांचे यादीतील घरकुलाचे काम सुरु नाही असे दर्शविते. तसेच पंचायत समिती, राहुरी यांच्या यादीमध्ये घरकुल काम लेंटल लेव्हलला आल्याचे दर्शविते. सदर लाभार्थ्याच्या नावावर बोगसरीत्या एकुण ३ चेक पास झालेले निदर्शनास येत आहेत.

असे असतांना प्रत्यक्षात सदर लाभार्थ्यास यापैकी कुठलाही लाभ मिळालेला नाही. आजतागायत सदर लाभार्थ्यास लाभास वंचित ठेऊन कागदोपत्री त्याच्या नावे बोगस बिले काढली जात आहेत. तरी आपण सदर झालेल्या घोटाळ्याची आपले स्तरावर योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी या दोषींवर कामात फेरफार केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.

आज पासून ८ दिवसांच्या आत संबधितांवर कोणतीही कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय, राहुरी येथे घरकुल योजना घोटाळा बंद करणेकामी आरपीआयच्या वतीने उपोषण करणार. असे निवेदनात म्हटले आहे.

राहुरी तालूक्यात मागासवर्गीय लोकांच्या नावावर रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत बोगस प्रकरणे दाखवून मोठ्या प्रमाणावर शासनाची आर्थिक लूट होत आहे.

प्रशासनातील काही अधिकारी आपल्या पदाचा दुरूपयोग करून मागासवर्गीय लोकांच्या नावावर बोगस प्रकरणे करत असल्याचे समोर येत आहे. प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाहीतर आरपीआय आठवले गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे यांनी दिला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे, तालूका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, शहराध्यक्ष सचिन साळवे, राजू दाभाडे, सुनिल पंडित, करीम शेख, महिला आघाडी तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे, छाया दूशिंग आदिंच्या सह्या आहेत.