विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार – आ.राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी :- शहराची वाढती लोकसंख्या आणि देशभरातून येणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेवून नगर पंचायतीला नागरी सुविधांची व्यापकता वाढवावी लागेल असे मत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आगामी दोन वर्षात नगर पंचायतीस विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीच्या वतीने चिल्ड्रन गार्डन,वाचनालय इमारत, कब्रस्तान विकास कामाचे भूमीपूजन आणि प्रसादलयाकडे जाणा-या नविन रस्त्याचे उद्घाटन व भूमीपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  

उद्घाटनाचे सर्व कार्यक्रम आ.विखे पाटील यांनी स्थानिक नागरीक आणि बाहेर गावाहून आलेल्या साईभक्तांच्या हस्ते केले. यानिमिताने आयोजित कार्यक्रमात आ.विखे यांच्या हस्ते श्री.साईबाबा  संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती  अर्चनाताई  कोते उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते.बाबासाहेब डांगे दिलीप संकलेचा शिवाजी गोंदकर सभापती छायाताई शिंदे  प्रतापराव जगताप अरूण जाधव प्रताप कोते मुख्याधिकारी सतिष दिघे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की दूरदृष्टीचा विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे आज शिर्डीचे स्वरूप बदलले आहे.मागील पंचवीस वर्षातील बदल हा या शहराला नविन चॆहरा मिळवून देणारा ठरला.आज साईभक्तानी या शहराचे वैभव वाढविल्यामुळेच या शहराला स्थैर्य प्राप्त मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

शहरातील सुविधांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेकडे लक्ष वेधून आ.विखे म्हणाले की या जागांच्या मालकांची तातडीने बैठक घेवून या जागा शहर विकासासाठी उपयोगात आणाव्यात आशी सूचना करून त्यांनी केली. रेल्वे आणि विमानतळाची सुविधा उपलब्ध झाल्याने  शहरात  भाविकांची  संख्या वाढत आहे.

भविष्यात रेल्वे गाड्याची संख्या वाढणार आहे. येत्या महीन्या भरात नाईट लॅन्डीगची व्यवस्था सुरू होणार असल्याने  विमान कंपन्या सुविधा देण्यास तयार आहेत. इतक्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने भाविकांची येणारी संख्‍या लक्षात घेवून या शहराची स्‍वच्‍छता, सुरक्षितता आणि या शहराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी स्‍थानिक नागरीक, नगरसेवक आणि व्यावसायिकांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिर्डी संस्थांमधील कर्मचा-याच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहीलो. १०५२ कर्मचार्याप्रमाणे उर्रवरीत कर्मचार्याचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासित करतानाच संस्थान कर्मचार्याना पेन्शन योजना लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही आ.विखे यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24