अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- अलीकडे चोरटे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,डाळिंब यासह विविध पिकांची चोरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यातील चोरी करणारे देखील भुरटे चोरटे अथवा सराईत गुन्हेगार असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
परंतु उपसरपंचानेच एका शेतकऱ्याचा चक्क १०० टन उसाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील लांडेवाडी शिवारातील दोन लाख रुपये किमतीच्या १०० टन उसाची चोरी केल्याप्रकरणी लांडेवाडी येथील उपसरपंचास सोनई पोलिसांनी अटक केली आहे.
लांडेवाडी शिवारातील साडेतीन एकरातील सोळा महिन्याचा शंभर टन उस हार्वेस्टरने तोडून ट्रक व ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेल्याची फिर्याद भरत जाधव यांनी सोनई पोलिस ठाण्यात दिल्यानंतर
पंचनामा करून जवळच्या शेतकऱ्यांचा जवाब घेतल्यानंतर लांडेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पद्माकर दरंदले, ऋषिकेश संजय दरंदले,
रवींद्र हारदे व बबन पद्माकर दरंदले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसरपंच दरंदले यास लांडेवाडी येथील एका वस्तीवरुन अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता
त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.