अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली.
याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे (सर्व रा. आलमगीर, भिंगार), सचिव अनिल तुळशिदास शिंदे, उपाध्यक्ष मंगला अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपुर) व
सदस्य राजु बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी.), संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (दोघे रा. आलमगीर, भिंगार) यांनी नंदू गोवर्धन कोतकर (वय ४३, रा.निंबळक, ता.नगर) यांना शिक्षक या पदावर नियुक्ती करतो, असे सांगुन मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली.
त्यानंतर त्यांनी कोतकर यांच्याकडुन १० लाख रूपये घेतले व शासनाची ऑर्डर मिळवुन देवू असे सांगुन विश्वास संपादन केला. त्यानंतर कोतकर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली.
त्यांनी पगाराची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला. याप्रकरणी नंदू कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.