Ahmadnagar breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीसह १६ आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशा आशयाचे पत्र खुद्द तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे या अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.
दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहारा प्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरुद्ध (दि.१९) ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित ४ जणांना अटक करण्यात आली होती.
यानंतर पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होऊन ७ दिवसांचा कालावधी होऊनही या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व इतर १६ आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक सध्या रजेवर आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशा आशयाचे पत्र आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त राहणार असल्याने तपास कामात अडथळे येऊ नये, यासाठी आपण पोलीस अधीक्षकांकडे ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.