अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटींचे पालन न करणारी मंगल कार्यालये, तसेच आयोजकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. सोमवारी येथील अमृता लॉन्सच्या व्यवस्थापकांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
रविवारी येथील विघ्नहर्ता लॉन्समध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पानसरे यांच्या मुलीचे लग्न होते. अगोदरच लग्नाचे निमंत्रण नातेवाईक व मित्र परिवाराला मोठ्या प्रमाणावर देण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी सर्व संबंधितांना लग्नाला न येता घरुनच वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत व आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
५० नातेवाईकांना प्रवेश देत कार्य उरकले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. अमृता लॉन्सवर झालेल्या कारवाईमुळे लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांवर आता मोठी मर्यादा आली आहे.
शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मंगल कार्यालयांची पाहणी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी केली.