अहमदनगर: विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार ही उत्सुकता सर्वांनाच लागली होती. कारणं ही असाच आहे महा विकास आघाडी चे सरकार आल्यानंतर जिल्हा परिषद मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम एक महिना आधीच होणार आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार आता 21 डिसेंबरपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसांत झेडपीच्या नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात येईल. प्रशासनाच्या प्राथमिक नियोजनानुसार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या सोडती या शुक्रवारी 13 डिसेंबर काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ 21 सप्टेंबरला संपला होता. मात्र, याच काळात विधानसभा निवडणूका होणार असल्याने राज्यातील 21 सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्हा परिषदांना 120 दिवस चार महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. त्यानूसार ही मुदत 21 जानेवारीला संपणार होती.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे पुढील अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी असल्याने पदासाठी चांगलीच चुरस होणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली असून तोच फॉम्यूला नगरमध्ये वापरल्यास विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची अडचण होणार आहे.
मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत यापूर्वी एकदा ऐनवेळी विखे यांनी ‘चमत्कार’ केलेला असल्याने महाआघाडीही सावध आहे. त्यामुळे कोंडी कोणाची आणि सरशी कोणाची याविषयी उत्सुकता आहे.