ब्रेकिंग

पालकमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी या शहरात ५० बेडच्या कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- जीवघेण्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य आ.आशुतोष काळे यांनी काळाची गरज ओळखून बांधण्यात आलेल्या कोपरगाव येथे ५० बेडच्या कोविड हॉस्पिटलचे व ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार (दि.८) रोजी दुपारी ३.०० वाजता होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर व ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारून व आरोग्य विभागासाठी आवश्यक साधन सामुग्री व साहित्याचा पुरवठा केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात मोठे यश मिळाले

व कोरोनाच्या पहिल्या लाटेला परतावून लावले.त्यानंतर आलेली दुसरी लाट मोठ्या प्रमाणात घातक होती. त्यावेळी ऑक्सिजन व ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती व आरोग्य विभागाकडून देखील कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले होते.

त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल ओळखून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात विस्तारित ५० बेडचे कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेऊन तातडीने काम सुरू केले होते.
हे काम नुकतेच पूर्ण झाले असून कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी ५० बेडचे कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन प्लांट सज्ज झाला आहे.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची कायमस्वरूपी सोय होणार असून या ५० बेडचे कोविड हॉस्पिटल व ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office