अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचावर खुनाचा गुन्हा दाखल,ग्रामपंचायतच्या खर्चाचा हिशोब मागीतल्याने…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायतमध्ये मागील खर्चाचा हिशोब मागीतल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सरपंच व उपसरपंच पती यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली होती. त्यावेळी केलेल्या मारहाणीत मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता.

उपचारादरम्यान तीन दिवसानंतर या सदस्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जामखेड तालक्यातील घोडेगाव येथे घडली. याबाबत रेखा रावसाहेब रावण यांनी फिर्याद दिली आहे.यामुळे जामखेड तालुक्यासह खर्डा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही आरोपी पसार आहेत.

या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा गणेश रावसाहेब रावण हा ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो व शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते.

यानंतर सरपंच पदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. व वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. पण एक वर्ष झाले तरी सरपंच शरद जगताप याने राजीनामा दिला नाही. यामुळे मयत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत वाद होत होते.

यानंतर दि. ३० जून २०२३ रोजी गणेश हा सकाळी १० वाजता ग्रामपंचायत मध्ये मिटींगसाठी गेला नंतर दुपारी तो घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेला दिसला, त्याने जेवनही केले नव्हते याचे कारण विचारले तर त्याने डोके दुखत आहे असे सांगितले.

डोके दुखण्याचे कारण विचारले तर त्यांने सांगितले की, ग्रामपंचायतमध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंचाचे पती शमशाद शौकत मुलानी, ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली.

मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तु हिशोब मागतो काय, म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही म्हणून शौकत मुलानी याने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली.

यावेळी शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली. यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे असे सांगितले.

यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी गणेशला उलटी झाली. यानंतर गणेश यास जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले, नंतर सीटीस्कॅन करण्यात आला याचा रिपोर्ट आल्यावर नगरला खासगी रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले यानुसार नगरला दाखल केले.

याच उपचारादरम्यान दि. २ जुलै २०२३ रोजी सकाळी गणेश मयत झाला. यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये वैद्यकीय अहवालावरून दि. २५ ऑगस्ट रोजी मयत गणेशची आई रेखा रावसाहेब रावण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.