कचरा फेकणाऱ्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहर स्वच्छ झाल्याचे चित्र आहे. शहरातील ११० कंटेनर काढल्यानंतरही त्या जागेवर कचरा फेकणाऱ्यांकडून सुमारे ५० हजारांचा दंड मनपाने वसूल केला आहे.

स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून पथकांची बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्यांवर करडी नजर आहे. थ्री स्टारच्या मानांकनासाठी आलेली चार सदस्यीय समितीही शहरात तळ ठोकून आहे.

अहमदनगर शहर स्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आता नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात साचलेला कचरा नागरिक कंटनेरमध्ये टाकत होते, हा कंटेनरही वेळेत उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र शहरात होते.

कचरा कोंडीतून शहराची सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावीपणे घरोघर जाऊन कचरा उचलण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली. त्यामुळे घंटागाडी पोहोचत नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या. पुढच्याच टप्प्यात मनपाने ११० ठिकाणी ठेवलेल्या सर्व कुंड्या उचलून शहर कचराकुंडी मुक्त केले. दुकानदार तसेच व्यावसायिकांना कुंड्या ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.

तसेच महापालिकेनेही ओला व सुका कचरा विलगीकरणाचे आवाहन वेळोवेळी केले. नागरिकांकडून मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत अाहे. परंतु, काही बेशिस्त नागरिकांकडून अजूनही कुंडी नसल्याने रस्त्यावर कचरा फेकण्याचा प्रयत्न होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी मनपाने १६ पथके नियुक्त केले असून प्रत्येक पथकात आठ ते दहा व्यक्तींचा समावेश आहे.

ज्या ठिकाणाहून कंटेनर उचलले आहे, त्या ठिकाणी फलक लावून कचरा फेकल्यास कारवाईचा इशाराही मनपाने दिलेला आहे. त्यानुसार आतापर्यंत मनपाने सुमारे २०० जणांकडून सुमारे ५० हजाराचा दंड वसूल केला आहे. मनपाचे पथक शहरातील प्रत्येक चौकात बेशिस्तपणे कचरा फेकणाऱ्यांवर करडी नजर ठेऊन आहे.

Web Title – A fine of 50 thousand was recovered from the garbage dumpers

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24