नेप्तीत बिबट्याच्या संचाराने दहशत;विद्यार्थी व महिलांमध्ये घबराहट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती मध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने गावासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. नेप्तीत गडाख वस्ती, होळकर वस्ती, रानमळा, खळगा वस्ती येथे बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे तर शेतीकाम करणार्‍या महिलांनी शेतात जायचे बंद केले आहे. या दहशतीपोटी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.


गावात बिबट्याचा संचार असल्याची वार्ता पसरताच सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी शनिवारी (दि.10 ऑगस्ट) वन विभागाच्या अधिकार्‍यांना बोलवून परिसराची पहाणी करायला लावली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी थिटे, ग्राउंड ऑफिसर अनिल गावडे, वनरक्षक रामचंद्र अडागळे, वनमजुर बापूसाहेब चव्हाळे, रवींद्र होळकर, सागर कर्पे, संतोष चौरे, राजू गडाख, विनोद कदम, विक्रम कदम, शिवाजी गडाख, सचिन कदम, नितीन पवार, किरण गडाख, राजू पवार, भानुदास फुले, विजय कर्पे, संतोष बेल्हेकर आदिंसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


या परिसरात वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली असता त्यांना बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. याची तातडीने दखल घेत बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.

दोन दिवसापासून बिबट्या दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ सांगत आहे. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने अन्न व पाण्यासाठी या प्राण्यांना मानवी वस्तीकडे मोर्चा वळविला आहे. मानवी वस्तीत येऊन माणसांबरोबरच पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी या भागात तरस प्राणी आढळल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24