Srirampur Breaking : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात बुधावारी रात्री एका तरुणावर चक्क दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यात तरुण जखमी झाला आहे. याच परिसरात दुसऱ्या तरुणावरही याच बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वडाळा महादेव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय रस्त्यावरील शिंदे वस्ती परिसरातील दीपक एकनाथ शिंदे ( वय ३२) हा तरुण बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातून घरी परतत होता. यावेळी वस्तीजवळ दोन बिबट्यांनी त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला.
हल्ल्यात शिंदे हा गाडीवरून खाली कोसळला. त्याच्या गुडघ्याला व पायाला जखम झाली. त्याचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्याला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्यानंतर नेवासा रस्त्यावरील राऊत वस्ती नजीक दोन बिबट्यांनी आणखी दुसऱ्या एका तरुणावर हल्ला केला. वडाळा महादेव येथील कैलास गांगुर्डे हा तरुण वडाळ्याहून श्रीरामपूरला जात असताना त्याला दोन बिबटे दिसले.
मात्र सावधगिरी बाळगत तरुणाने मोटारसायकलचा वेग वाढवला. बिबट्यांनी झेप घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला.
पाळीव प्राणी केले भक्ष्य
वडाळा महादेव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. अनेक पाळीव प्राणी, शेळी, बोकड यांना बिबट्याने भक्ष्य केले आहे. मोटारसायकलवरील तरुणावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने परिसरात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी वडाळा महादेव ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, आणखी एक बिबट्या हरेगाव फाट्यावर दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले.