Ahmadnagar Breaking : अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली आहे.
ओमप्रकाश रामबच्चन महतो (वय ३५, रा. शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी, मूळ रा. बिहार) असे या मयत कामगाराचे नाव आहे.खुनाची ही घटना एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट नं एफ ७१ च्या पाठीमागील मोकळ्या जागेत बुधवारी (दि.६) रात्री ८ ते गुरुवारी (दि.७) सकाळी ८.३० या कालावधीत घडली आहे.
या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला एका व्यक्तीने पहिला व सकाळी ८.३० च्या सुमारास एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच स.पो. नि. राजेंद्र सानप हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता तो मुळचा बिहार आणि सध्या शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी येथे राहत असलेल्या ओमप्रकाश रामबच्चन महतो याचा असल्याचे आढळून आले.
खुनाची घटना समजल्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
पोलिस अधीक्षक ओला यांनी स.पो. नि. राजेंद्र सानप यांना या गुन्ह्याचा तातडीने तपास करून मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी विविध सूचना केल्या. काही वेळात श्वान पथक, ठसेतज्ज्ञ पथक तसेच फॉरेन्सिक लॅब पथकानेही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
या बाबत मयत ओमप्रकाश याची पत्नी दुर्गादेवी ओमप्रकाश महतो यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. सानप हे करीत आहेत.