अहमदनगर लाईव्ह 24 टीम/संगमनेर : तालुक्यातील घारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोबाइल शॉपी फोडली. तसेच सायकल दुकानातील टायर, ट्युब व एका चिकन शॉपमधून कोंबड्याही चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि.१५) रात्री दहा ते सोमवार दि. १६ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ व दुकानदार चांगलेच संतप्त झाले आहेत. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घारगाव बसस्थानक परिसरात संदीप रोहिदास फटांगरे या तरुणाचे कृष्णा मोबाइल ॲण्ड वॉच सेंटर हे दुकान आहे.
शेजारी हेमंत करंदीकर यांचे सार्थक सायकल मार्ट हे दुकान असून, दुकानात ट्युब, टायर, सायकलचे साहित्य होते, तर राजुद्दीन शेख यांचे कादरी चिकन सेंटरमध्ये कोंबड्या, कोयता, सुरी आदी साहित्य होते. नेहमीप्रमाणे या तिघांनीही रविवारी सायंकाळी आपापली दुकाने बंद करून ते घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता त्यावेळी दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेत दिसून आले. फटांगरे यांनी आतमध्ये जावून पाहिले असता दुकानातील तीस हजार रुपये किंमतीचे मोबाइल साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
सायकलच्या दुकानातही टायर, ट्युब आदी साहित्य नव्हते, तर कादरी चिकन सेंटरमध्ये असलेल्या कोंबड्या, कोयता, सुरी चोरट्यांनी चोरून नेल्या.
घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संदीप फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.