एका दुचाकीमुळे प्रतिष्ठित व्यापारी अडकला संशयाच्या भोवऱ्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच राहुरी तालुक्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी हौदास माजवला आहे. अनेक दुचाक्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे राहुरी शहर हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यापार्‍याकडे चोरीची दुचाकी आढळून आली आहे.

पोलिसांनी सध्या ती दुचाकी ताब्यात घेतली असून त्या व्यापार्‍याची चौकशी चालू आहे. दरम्यान, तालुक्यात दुचाकी चोर्‍या वाढल्याने पोलीस या प्रकरणाचा शोध घेत होते, यावेळी पोलिसांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली, राहुरी शहरातील जैन स्थानक परिसरात एका प्रतिष्ठित व्यापार्‍याकडे निळ्या रंगाची एक दुचाकी आहे.

ती दुचाकी चोरीची आहे. खबर मिळताच त्या पोलीस अधिकार्‍याने काही पोलीस कर्मचारी सोबत घेऊन जैन स्थानक परिसरातील त्या व्यापार्‍याच्या घरी दाखल झाले.

यावेळी ती दुचाकी त्या व्यापार्‍याच्या घरासमोरच उभी होती. पोलीस अधिकार्‍यांनी त्या व्यापार्‍याला विचारले, दुचाकी कोणाची आहे? त्यावेळी व्यापारी म्हणाला, माझीच दुचाकी आहे. मी एका महिलेकडून विकत घेतली आहे. असे त्या व्यापार्‍याने सांगितले. यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी त्या दुचाकीचे कागदपत्र मागितले.

परंतु त्या व्यापार्‍याकडे दुचाकीचे कागदपत्र नव्हते. ज्या महिलेकडून त्या व्यापार्‍याने दुचाकी घेतली, त्या महिलेकडे चौकशी केली. तर तिच्याकडेही दुचाकीचे कागदपत्र नव्हते.

ती दुचाकी माझ्या भावाकडून आणल्याचे त्या महिलेने सांगितले. मात्र, दुचाकीचे कागदपत्र नसल्याने ती दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. आणि कागदपत्र आणून दाखवा व दुचाकी घेऊन जा. असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

रात्री उशिरापर्यंत त्या व्यापार्‍याची पोलीस चौकशी करीत होते. ती दुचाकी चोरीची आहे का? विकत घेतली आहे. याची चौकशी पोलीस करीत आहेत.

मात्र, विना कागदपत्राची दुचाकी घेणारा तो जैन स्थानक परिसरातील व्यापारी कोण? ती महिला कोण? परजिल्ह्यातून राहुरी शहरात ती दुचाकी आली कशी? दुचाकी जर चोरीची असेल तर कोणा कोणावर गुन्हा दाखल होणार? याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24