Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली.
आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा हातात घेऊन फिरत आहे, अशी गुप्त खबर राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजे दरम्यान पोलीस हवालदार अशोक शिंदे, गणेश सानप, सुरज गायकवाड, राहुल यादव, भगवान थोरात,
आजिनाथ पाखरे आदी पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे जाऊन पाहणी केली. तेथे एक तरुण धारदार सूरा हातात घेऊन फिरताना त्यांना दिसून आला. पोलीस पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.
त्याच्याकडून धारदार सूरा जप्त केला. पोलीस नाईक भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणावर गुन्हा रजि. नं. ५२९/ २०२४ शस्त्र अधिनियम कलम २५/४ प्रमाणे आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आई वडिलांचे प्राण वाचले. पोलीस प्रशासनाच्या या कामगीरीचे सामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.
तसेच राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध्य शस्त्रा बाबत काही माहिती असल्यास त्वरीत राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधवा. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.