ब्रेकिंग

नगरच्या 13 वर्षीय अबशाम पठाणने दोन दिवसात सर केला केदारकंठ शिखर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  येथील कर्नल परब शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकणार्‍या 13 वर्षाच्या अबशाम फिरोज पठाण याने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेत असलेल्या 12 हजार पाचशे फुट उंचीचे केदारकंठ शिखर दोन दिवसात सर केला.

केदारकंठ शिखर ट्रेक करण्याचा अत्यंत कठीण आणि खडतर ट्रेक आहे. तीन ते पाच फूट उंचीच्या बर्फातून तीन दिवस चालावे लागते.

हा शिखर पठाण याने सर केल्याचे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. सांक्री या बेस व्हिलेज पासून या ट्रेकला सुरुवात होते. 9 हजार पाचशे फुटावर जुडा का तालाब या बर्फाच्छादित तलावावर पहिला मुक्काम असतो.

दुसरा मुक्काम 11 हजार 250 फुटावर हाडे गोठवणार्‍या थंडीत आणि बर्फाच्छादित छोट्याच्या समतोल जागेवर असतो. त्याच दिवशी रात्री दोन वाजता 90 अंशाच्या काटकोनी शिखरावर सुमारे पाच तासांची चढाई करावी लागते.

सर्वत्र बर्फ असल्यामुळे कोठेही विश्रांतीसाठी बसता येत नाही. सकाळी सुमारे साडेसहा वाजता हा ट्रेक पूर्ण होतो. सूर्याची किरणे बर्फावर पडून सर्व बर्फाळ भाग सोनेरी दिसतो.

हा एक विलक्षण अनुभव असतो. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तिसर्‍या दिवशी केदारकंठ शिखर सर होतो. माघारी येताना याच प्रकारे दोन दिवस बेस व्हिलेज पर्यंत लागतात.

परंतु अबशाम पठाण याने हा शिखर दोन दिवसात सर केला तर एका दिवसात तो गेलेल्या मार्गाने परतला. हे अवघड शिखर सर केल्याबद्दल कर्नल परब शाळेचे संचालक दिलीप परब,

गीता परब, अहिल्या शिवप्रेमी ट्रॅकर्सचे संचालक इंजिनियर श्रीरंग राहिंज यांनी त्याचे विशेष कौतुक केले. अबशाम हा अहमदनगर जिल्हा पालक संघटनेचे सचिव असगर सय्यद यांचा नातू आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office