अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले.
विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा घेतलेला फोटो पोलिस तपासात मोठा दुवा ठरला. हा आरोपी फिरोज शेख आहे. रेखा जरे आणि गुड्डू शिंदे यांच्यात वाद सुरू असताना फिरोज वाहन अडवून उभा होता. जरे यांच्या मुलाने आपल्या मोबाइलमध्ये फिरोजचा फोटो काढला.
हा फोटोच पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेला. सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून ते कोल्हार परिसरात लपून बसले होते. तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता.
पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. खुनाच्या घटनेबाबत गेल्या दोन दिवसापासून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या हाती बऱ्यापैकी माहिती लागलेली आहे तसेच ज्या आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत,
त्यांच्या फोनचे रेकॉर्ड सुद्धा पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जाते. जरे यांचा कोणाकोणाशी संपर्क झालेला आहे, त्याची माहिती पोलिसांनी घेतली असून दोनजणांची चौकशी करण्यात आलेली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved