ब्रेकिंग

अहमदनगर की बिहार ? भागानगरे खून प्रकरणातील पसार आरोपीचे अपहरण,माळीवाड्यात बेदम मारले,पोलिसांची पळापळ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरण राज्यात गाजले. शहरात या खून प्रकरणाने खळबळ उडवून दिली. अवैध धंद्यांची माहिती दिल्याप्रकरणी हा खून झाला असे म्हटले जाते. दरम्यान काल (दि.२) या प्रकरणातील मुख्य आरोपीना मदत करणारा व सध्या फरार असणारा आरोपी संतोष अविनाश सरोदे याचे अपहरण करून त्याला माळीवाड्यात बेदम मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती समजताच पोलिसांची धावपळ उडाली. मोठा पोलिसांचा फौजफाटा माळीवाडा परिसरात होता. ही घटना शनिवारी (दि.२) सकाळी साडेअकरा वाजता घडली. तोफखाना पोलिस ठाण्यात ओंकार घोलप, कृष्णा भागानगरे, भैय्या बीडकर व एका अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमेके काय घडले?

फिर्यादीत सरोदे याने सांगितलं की, मित्रांसोबत वाद झाल्याने सहा महिन्यापूर्वी मी पुण्यास गेलो होतो. शनिवारी सकाळी मी नगरला आलो. बालिकाश्रम रस्त्याने चाललो असताना दोन दुचाकीवर ओंकार घोलप, कृष्णा भागानगरे, भैख्या बीडकर व एक अनोळखी व्यक्ती आले.

मी रिक्षातून उतरून व प्रेमदान चौकाकडे माझ्या बहिणीकडे भेटण्यासाठी पायी जात असताना मला ओकार घोलप याने दुचाकीवर बसवले व चौघांनी मला माळीवाडा फुलसौदर चौक येथे बालाजी पान सेंटर जवळ नेले.

लाकडी दांडक्याने पायावर, डोक्यावर उजव्या कानाच्या मागे व डोळ्याजवळ मारहाण केली. दरम्यान चारही आरोपींच्या शोधासाठी तोफखाना पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

अपहरण..मारहाण..व पोलिसांची पळापळ

भागानगरे खून प्रकरणानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हा विषय राज्यात गाजला. याचा प्रकरणातील पार्श्वभूमीवर शनिवारी हल्ला झाला. त्यानंतर मात्र पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी पथकासह माळीवाडा परिसरात धाव घेतली. विविध पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आले.

असे केले ओंकार भागानगरे हत्याकांड

२० जून रोजी रात्री एकच्या सुमारास हत्याकांड घडले होते. ओंकार घोलप व ओंकार उर्फ गामा भागानगरे यांच्यावर गणेश हुच्चे व त्याच्या सहका-यांनी अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून हल्ला केला होता. यात भागानगरे याचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरु असताना सरोदे याने या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याचे तपासात समोर आल्याने त्याच्यावरही गुन्हा नोंदवला. मात्र तो फरार झाला.

अहमदनगर लाईव्ह 24