मतिमंद महिलेवर अत्याचार करणार्‍या आरोपीची पिडीत कुटुंबीयांना धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- वाळकी (ता. नगर) येथील मातंग समाजातील मतिमंद दिव्यांग महिलेवर अत्याचार करणार्‍या व पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपींवर कारवाई करावी,

कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे, नामदेव चांदणे, संजय चांदणे, विशाल भालेराव, कडूबाबा लोंढे, रमेश पाचारणे आदिंसह पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

नगर तालुक्यातील वाळकी येथे दि.16 फेब्रुवारी रोजी घराशेजारी राहणार्‍या पोपट जगन्नाथ दांगडे याने मतिमंद दिव्यांग महिलेवर अमानुषपणे बलात्कार केला होता.

त्यानंतर आरोपीवर बलात्कार व अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. आरोपीस अटक करून त्याच्यावर कार्यवाही झाली.

त्यानंतर त्याला मागील महिन्यात जामिनावर सोडण्यात आले असून, तो सध्या खुलेआम फिरत आहे. तर आरोपी पोपट दांगडे हा पिडीत महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची व घर जाळण्याची धमकी देत आहे.

पिडीत कुटुंबीय मातंग समाजातील गरिब परिस्थिती असल्याने ते दहशतीखाली वावरत आहे. आरोपी हा जाणीवपूर्वक पिडीत महिलेच्या कुटुंबीयांना जाणीवपुर्वक त्रास देऊन दहशत निर्माण करत आहे.

दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी वारंवार शिवीगाळ करुन धमकावीत आहे. तर पिडीत कुटुंबीयांचा येण्या-जाण्याचा रस्ता देखील काटे टाकून बंद करण्यात आला आहे.

आरोपीचे नातेवाईक जवळ राहत असल्याने पिडीत कुटुंबातील सर्वच सदस्य धास्तावले आहेत. कर्ता पुरुष देखील घराबाहेर निघत नसल्याने या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मतिमंद दिव्यांग महिलेवर अत्याचार करणार्‍या व पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24