1 महिन्‍यात एमआरआय मशिन बसविण्‍याची कार्यवाही करावी.-मा.सभापती श्री.मनोज कोतकर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्‍थायी समितीच्‍या सभेमध्‍ये कल्‍याण रोड वरील वसाहतीमधील पाणी प्रश्‍ना संदर्भात वादळी चर्चा झाली असून नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे यांनी मनपा प्रशासनाला सांगितले की, शहरात दिवसाआड पाणी येते मग कल्‍याण रोडला 10 ते 12 दिवसांनी पाणी का दिले जाते.

येत्‍या 10 दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्‍यास आयुक्‍त यांचे दालनात तीव्र स्‍वरूपाचे आंदोलन करण्‍याचा इशारा यावेळी दिला. सभापती मा.श्री. मनोज कोतकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी श्री.रोहिदास सातपुते यांना सांगितले की, पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा तसेच टॅकर वरील चालक पैसे घेवून पाणी पुरवठा करण्‍या संदर्भात कारवाई करण्‍यात यावी. तसेच फेज-2 योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. कल्‍याण रोड वर दररोज 6 टॅकरने पाणी पुरवठा होत असून एक टॅकर दररोज 4 ते 5 खेपा करत असून दिवसाला सुमारे 30 खेपा केल्‍या जातात.

एक टॅकर 12 हजार लिटर क्षमतेचा आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाटूनही नागरिकांची तहान भागविली जात नाही. तसेच नळाद्वारेही पाणी पुरवठा केला जातो याचा अर्थ मनपा प्रशासनाने नियोजन नसल्‍याचे निदर्शनास येत आहे. यापुढील काळात कल्‍याण रोडचा पाणी प्रश्‍न कायम स्‍वरूपी सोडवावा. तसेच कायनेटीक चौक येथे पाण्‍याची टाकी, केडगांव व अरणगांव शिवरात पाण्‍याची टाकी बायपास कांबळे मळा येथे जमिनी अंतर्गत पाण्‍याची टाकी उभारण्‍यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू करावी असे आदेश यावेळी सभापती मा.श्री.मनोज कोतकर यांनी दिले.

दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर मनपाचे कायम कर्मचारी पगार, सानुग्रह अनुदान, सेवा निवृत्‍त कर्मचा-यांची पेन्‍शन, मानधनावरील कर्मचा-यांचा पगार उदया पर्यत त्‍यांच्‍या खात्‍यावर जमा करण्‍याचे आदेश यावेळी उपायुक्‍त व लेखापरिक्षक यांना देण्‍यात आले. कोणताही कर्मचारी वंचित राहणार नाही याची काळजी घ्‍यावी. त्‍यामुळे सर्व कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच नगरसेवकांचेही मानधन काढण्‍याचे आदेश यावेळी देण्‍यात आले. जिल्‍हा नियोजन समितीकडून अ.नगर मनपाला एमआरआय मशिन खरेदीसाठी 3 कोटी 5 लाख रूपये दिल्‍यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्‍यात आली.

पुणे येथील लोकमान्‍य संस्‍थेने ही मशिन पुरविण्‍याचे काम केले. परंतु आजतागायत बसविण्‍यात आली नाही. नविपेठ येथील दवाखान्‍या मध्‍ये बसविण्‍यात येणार होती.परंतु इमारतीचे ट्रक्‍चर ऑडीट केल्‍यामुळे त्‍या ठिकाणी बसविण्‍यात येणार नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. सावित्रीबाई फुले भाजी मार्केट सावेडी या इमारतीचे ट्रक्‍चर ऑडीट केल्‍यानंतर या ठिकाणी बसविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. यावेळी डॉ.सागर बोरूडे यांनी सांगितले की, मनपाची आर्थिक नुकसान होवू नये लोकमान्‍य संस्‍थेकडून आलेल्‍या करारनाम्‍यात वीज बिल व पाणी मोफत मिळावे

व इमारतीचे कोणतेही भाडे संस्‍थेला आकारू नये या अटी शर्ती आल्‍या असल्‍यामुळे ही निविदा मंजूर करू नये तसेच नगरसेवक मा.श्री.प्रकाश भागानगरे म्‍हणाले की, मनपाच्‍या प्रशासकीय हलगर्जीपणा मुळे एमआरआय मशिन धुळ खात पडून होती. जानेवारी महिन्‍यातच हे मशिन सुरू केले असते तर नगर शहरातील रूग्‍णांना कोरोनाच्‍या काळामध्‍ये या मशिनचा उपयोग झाला असता. याकाळामध्‍ये मोठया प्रमाणात एमआरआयची आवश्‍यकता भासत होती. मा.श्री.गणेश भोसले, , मा.श्री.शाम नळकांडे यांनी मनपाचे नुकसान होत असेल

तर ही निविदा मंजूर करू नये असे सभापतीच्‍या निदर्शनास आणून दिल्‍या नंतर सभापती यांनी आदेश दिला की, एक महिन्‍याच्‍या आत मशिनकरिता आवश्‍यक असणारे बांधकाम पूर्ण करून मशिन सुरू करावी व एक एमआरआय प्रिंट काढून योग्‍य असल्‍याची खात्री करून मनपाने बिल अदा करावयाची कार्यवाही करावी. तसेच सर्व पक्षिय सदस्‍यांच्‍या चर्चेनुसार मशिन सुरू झाल्‍यानंतरच मशिनची देखीभाल व चालविण्‍याकामी लोकमान्‍य हॉस्‍पीटल पुणे यांच्‍या अर्जा व्‍यतिरिक्‍त इतर संस्‍थेचे अर्ज प्राप्‍त झाले असल्‍याने आर्थिक फायदयाचा विचार करून कोणत्‍या संस्‍थेस सुरू करावयाचे याबाबत पुढील स्‍थायी समितीच्‍या सभेत निर्णयास्‍तव प्रस्‍ताव फेर सादर करण्‍यात यावा असे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24