Ahmadnagar Breaking : कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बेपत्ता झालेल्या ३४ वर्षीय इसमाचा नुकताच गोदावरी नदी पात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धारणगाव येथील गणेश सुर्यभान वहाडणे (वय 34, रा. धारणगाव) हा मुसळगाव एमआयडीसी (ता. सिन्नर, जि. नाशिक) या ठिकाणी नोकरीस होता.
शुक्रवारी (दि. २०) रात्री धारणगाव कुंभारी येथील गोदावरी नदी वरील पुलावर त्याची दुचाकी आणि बॅग काही नागरिकांना मिळून आली. त्यावेळी गणेश याने गोदावरी नदी पात्रात उडी घेतली की काय, असा संशय ग्रामस्थ, नातेवाईकांना आला.
याबाबत तालुका पोलिसांना माहिती देताच तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गणेश वहाडणे याचा शोध सुरू केला. मात्र तो मिळून आला नव्हता. नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
दुसऱ्या दिवशी गणेशचा पुन्हा गोदावरी नदीत माजी नगरसेवक अनिल ऊर्फ कालू आप्पा आव्हाड यांच्या बोटीतून त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध सुरू केला. तेव्हा गोदावरी नदी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे पथक, कोपरगाव नगरपालिका अग्निशामक दल देखील हजर झाले होते. मात्र गणेश मिळून आला नाही.
अखेर रविवारी (दि.२२) सकाळी गणेश याचा मृतदेह पाण्याच्या डोहात तरंगताना दिसून आला. यावेळी तालुका पोलिसांना याबाबत माहिती देताच तालुका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत सदरील मृतदेह पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.
याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अप्पासाहेब कचरु वहाडणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ए. एम. आंधळे हे करीत आहे.