Ahmadnagar Breaking : बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असलेल्या डॉक्टरला भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सारसनगर परिसरात बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले व त्यांनी हल्लेखोराला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.
याबाबत डॉ. सचिन कांतीलाल भंडारी यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भीमराज पालडीया (रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे आरोपीचे नाव आहे. डॉ. भंडारी यांचे सारसनगर भागात राज हॉस्पिटल आहे.
त्यांच्या दवाखान्यात भीमराज पालडीया नावाचा इसम येत असे त्यामुळे त्या दोघांची ओळख होती. सन २०१२ मध्ये डॉ. भंडारी यांचे नातेवाईक गुगळे यांचा एक प्लॉट विकायचा होता. त्यावेळी पालडीया व त्याच्या दोन भावांनी डॉ. भंडारी यांचेकडे येवून तुमच्या नातेवाईकाचा प्लॉट आम्ही घेतो, असे म्हणून त्याचा व्यवहार केला.
त्यानंतर ५ वर्षांनी भीमराज पालडीया याने डॉ. भंडारी यांना तुम्ही माझी प्लॉट व्यवहारात फसवणूक केली आहे. असे म्हणत मारहाण केली होती. त्यावेळी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर अधून मधून पालडीया हा डॉ. भंडारी यांना फोन करत पैशांची मागणी करत होता.
बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास डॉ. भंडारी हे नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळण्यासाठी आपल्या मोपेडवरून जात असताना सारसनगर मधील महावीर सुपर मार्केट जवळ रस्त्यावर पालडीया याने डॉ. भंडारी यांना अडवले व त्याच्या कडील लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने हल्ला केला. याबाबत डॉ. भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी भीमराज पालडीया याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.