अहमदनगर ब्रेकिंग : टोलनाक्याजवळ प्राध्यापक अपघातात ठार, ऐन सणासुदीत अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक प्रकाश सोनाजी कारखेले (वय ५५, हल्ली रा. लोणी व राहुरी) यांचा हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्रा. प्रकाश कारखेले हे गुरुवारी सायंकाळी संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या अपघातात प्रा. कारखेले ठार झाले.

प्रा. कारखेले हे आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे इंग्रजी विषय शिकवत होते. मुळचे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील असलेले कारखेले हे नोकरीनिमित्त राहुरी व नंतर लोणी येथे स्थायिक झाले होते.

त्यांनी पुणे, नाशिक, चिंचोली, कोल्हार, पाथरे याठिकाणी ज्ञानदानाचे काम केले असून आश्वी खुर्द येथे मागील ८ वर्षांपासून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन मुली, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.

ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कारखेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या विद्यार्थ्यांसह आश्वी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. शुक्रवारी दुपारी राहुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.