अखेर ‘त्या’ अहमदनगरकरांनी कोरोनाला हरवलं !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वेळीच केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि त्यानंतर रुग्णावर झालेले योग्य उपचार यामुळे रूग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

आज संगमनेर तालुक्यातील ०४ तर जामखेड येथील ०४ रूग्ण त्यांचा १४ दिवसानंतरचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या ०८ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणसाठी संगमनेर आणि जामखेड येथे दाखल केले जाणार आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

संगमनेर शहरातील 3, आश्र्वी बुद्रुक येथील 1 आणि जामखेडमधील 4, असे 8 कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज दुपारी यांना रुग्णवाहिकेतून जामखेड आणि संगमनेर येथे हलविण्यात आले.

त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आणि ठणठणीत असल्याचे आणि ते पूर्णपणे बरे झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ते बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 29 आहे. यात, मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील आणि पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा ही समावेश आहे. तसेच, कोपरगाव येथील महिला आणि जामखेड येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. यापूर्वी, ०४ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १४ जण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आज सकाळी १० वाजेपर्यंत १९ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यात, १६ नवीन रूग्ण असून इतर ०३ मध्ये २ व्यक्तींचे १४ दिवसानंतर दुसरा अहवाल तर एका व्यक्तीचा १४ दिवसांनंतर पहिला अहवाल आहे. या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24