Ahmednagar Breaking : कांदयावरून अहमदनगर तापले ! शेतकऱ्याने मार्केटमध्येच घेतले विष, विविध बाजारसमित्यांमध्ये शेतकरी इतके संतप्त की कुणालाच अवरेनात

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यातबंदीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतकरी उग्र रूप धारण करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याने उग्र रूप पाहायला मिळाले.

कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केली असतानाही कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे बुधवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक झाला. संतप्त शेतकऱ्यांनी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.

यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा यावेळी अनेकांनी प्रयत्न केला परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.

केंद्राच्या फसव्या निर्यात धोरणाचा निषेध करत जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. बुधवारी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले. तर कांद्याला दर मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या कैलास भानुदास गादे (६२, रा. खुणेगाव ता. नेवासे) यांनी घोडेगाव मार्केट यार्डात विष घेतले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी अकोले येथेही लिलाव बंद पाडत अकोले-देवठाण रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

नेवासे तालुक्यातील खुणेगाव येथील भानुदास गादे यांना चार एकर जमीन आहे. त्यापैकी एका एकरवर त्यांनी कांद्याचे पीक घेतले आहे. त्यापैकी २५ गोण्या कांदे घेऊन ते घोडेगावच्या कांदा मार्केटमध्ये ते आले होते. भाव मिळत नसल्याचे पाहून त्यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घोडेगाव मार्केट यार्डात विष घेतले. त्यांना वडाळा मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मागील तीन दिवसांत ११०० ने पडले भाव

केंद्राने ३ मे रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते व त्यामध्ये त्यांनी निर्यातबंदी उठवल्यावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून तब्बल महिनाभरानंतर एक नंबर कांद्याचे दर शनिवारी ४ मे रोजी तीनशे ते चारशे रूपयांनी वाढून २ हजार रूपयांवर पोहोचले. ५ मे रोजी १७०० ते २३००, सहा मे रोजी १७०० ते २२०० मंगळवारी सात मे रोजी भाव पुन्हा घसरून १२०० ते १६०० पर्यंत कोसळले.

अकोले, संगमनेरमध्येही उद्रेक

अकोले बाजार समितीमध्येही शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत रास्तारोको केला होता. तसेच संगमनेरमधील शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव बंद पाडले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe