अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरात भाजप कार्यकर्त्याला बंदुकीचा धाक दाखवून सिनेमागृहातून पळवून नेत मारहाण करून त्याच्याकडील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज लुटण्यात आला.
हा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस उशीर करीत असल्याची माहिती मिळताच भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुरेश धस व माजी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली.त्यानंतर तब्बल तीन तासांनी पोलिसांनी सहा जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कृष्णा ज्ञानदेव बढे या आरोपीस अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भाजप कार्यकर्ते शाम अर्जुन हुले (रा. ढाळेवाडी, ता. पाटोदा) आपल्या दोन मित्रांसह मोटारसायकलवरून शुक्रवारी (२४ जानेवारी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जामखेड येथील चित्रपटगृहात चित्रपट पहाण्यासाठी आले होते
चित्रपट चालू असताना यातील आरोपी महादेव भीमराव खाडे (रा. करंजावणे), ऋषीकेश गोवर्धन सानप, महेश गोवर्धन सानप, कृष्णा ज्ञानदेव बडे (तिघे. रा. सौताडा, ता. पाटोदा), स्वप्निल उर्फ राणा सदाफुले, सनी उर्फ प्रिन्स सदाफुले (दोघे रा. जामखेड) व इतर आनोळखी एक असे एकूण सात जण त्या ठिकाणी गेले.
त्यांनी हुले यांना सिनेमागृहाच्या बाथरूमकडे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिनेमागृहाच्या बाहेर ओढत नेत रिव्हॉल्व्हर डोक्याला लाऊन गाडीत बसवले व साकत परिसरातील एका शेतात तलवारीचा धाक दाखवत हॉकीस्टीकने मारहाण करून गंभीर जखमी केले.
अपहरणकर्त्यांनी हुले यांच्या खिशातील सोन्याचे ब्रेसलेट, लॉकेट व रोख रक्कम १८ हजार रुपये असा एकूण दोन लाख ९३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घटनेनंतर आरोपींनी हुले याला त्याच ठिकाणी सोडून चारचाकी वाहनातून पळ काढला.